Skip to main content

“प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिशक्तीचा जल्लोष; पारसोंड येथे श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव भक्ती, समाजसेवा आणि क्रीडांचा संगम ठरला”

“प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिशक्तीचा जल्लोष; पारसोंड येथे श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव भक्ती, समाजसेवा आणि क्रीडांचा संगम ठरला”

प्रतापगड प्रतिनिधी : 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक किल्ले प्रतापगड च्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड (ता. महाबळेश्वर) येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आदिशक्ती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या यात्रोत्सवाचे यंदा सोळावे वर्ष असून, दि. १४ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांची मेजवानी ग्रामस्थांसह भाविकांना अनुभवायला मिळत आहे.


यात्रोत्सवाची सुरुवात १४ एप्रिल रोजी देवीच्या भव्य पालखी मिरवणुकीने, काठी उभारणी आणि महाप्रसादाने झाली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी ४३ गावांतील पारंपरिक विडे वर्तवण्याचा सोहळा पार पडला. १६ एप्रिल रोजी स्वराज्य लेझीम पथकाच्या दिमाखदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले, तर मध्यरात्री पारंपरिक ‘बगाड’ सोहळ्याने यात्रोत्सवाला धार्मिक उंची प्राप्त झाली.

यात्रोत्सवात धार्मिकतेसोबतच समाजाभिमुख उपक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी सकाळी किल्ले प्रतापगड ते पारसोंड अशी प्रज्वलित शिवज्योत मिरवणूक काढण्यात येणार असून, यामधून शिवभक्तीचा जागर होणार आहे. त्याच दिवशी गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला आणि बालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि कौशल्यवर्धक स्पर्धा, तर मुलांसाठी धावणे, चित्रकला अशा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेली ‘कै. सुशील सोंडकर स्मृती चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा २० व २१ एप्रिल रोजी रंगणार असून, आकर्षक पारितोषिकांमुळे स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच १८ एप्रिल रोजी ‘पारसोंड प्रीमियर लीग’ (PPL) चेही आयोजन करण्यात आले आहे.

यात्रोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जात आहेत. गरजू विद्यार्थ्यांना ‘आदिशक्ती शिष्यवृत्ती’ अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘आदिशक्ती आधार योजना’ अंतर्गत मोफत शिलाई मशीनचे वितरण करण्यात येत आहे. २१ एप्रिल रोजी ‘अकरावा आदिशक्ती गौरव पुरस्कार २०२६’ महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष (आबा) शिंदे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.

या यात्रोत्सवाची सांगता २२ एप्रिल रोजी पहाटे छबिना, पालखी मिरवणूक आणि लळीत या पारंपरिक कार्यक्रमांनंतर महाप्रसादाने होणार आहे. संपूर्ण उत्सवाचे नियोजन आदिशक्ती युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने करत असून, “उत्सवाच्या निमित्ताने समाजसेवा” हा वारसा जपत सर्व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारसोंड येथे भरलेला हा यात्रोत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता समाजएकता, परंपरा आणि आधुनिक सामाजिक जाणीव यांचा संगम ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...