ग्रामस्थांच्या भेटीगाठींमधून प्रचाराला गती; मुंबईतील गावकरीही समीर चव्हाण यांच्या पाठीशी ठाम
बिरवाडी प्रतिनिधी –
काळभैरवाच्या आशीर्वादाने आपल्या मातीचा सुगंध श्वासात घेऊन आणि गावाचं दुःख–सुख मनात साठवून काम करणारे गावचेच सुपुत्र समीर मधुकर चव्हाण यांनी कुंभरोशी गणातून पंचायत समितीच्या सदस्यपदासाठीअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा प्रचार वेग घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत समीर चव्हाण थेट संवाद साधत असून, या भेटींमुळे प्रचाराला अधिक बळ मिळालं आहे.
मुंबईतील सुखसोयींचं आयुष्य बाजूला ठेवून आपल्या गावासाठी आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतलेल्या समीर चव्हाण यांच्या भूमिकेचं गावकऱ्यांकडून विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून, विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गावचा खरा कणा असलेल्या तरुणांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत “घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे” असं ठामपणे सांगणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
विकासाचा केवळ आराखडा मांडण्याऐवजी विकासाचं स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्ष कामातून दाखवण्यावर समीर चव्हाण यांचा भर आहे. ग्रामसेवकाच्या भूमिकेतून शब्दांपेक्षा कामाला अधिक महत्त्व देत त्यांनी आजवर अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, त्याचा विश्वास ग्रामस्थांमध्ये अधिक दृढ झाला आहे. गावाच्या पाणीपुरवठा, रस्ते, युवकांसाठी संधी, तसेच मूलभूत सुविधांबाबत त्यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका लोकांना भावत आहे.
विशेष बाब म्हणजे मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या कुंभरोशी परिसरातील गावातील नागरिकांनीही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत समीर चव्हाण यांच्या समर्थनार्थ दंड थोपटले आहेत. गावासाठी झटणाऱ्या आपल्या माणसालाच संधी द्यावी, अशी भावना या गावकऱ्यांकडून व्यक्त होत असून, प्रचारासाठी ते गावात येण्याची तयारी दर्शवत आहेत.
गावाच्या प्रत्येक घरात उज्वल भविष्याचा दिवा पेटावा, तरुणांना संधी मिळाव्यात आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने समीर चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आपल्या मातीच्या लेकरालाच निवडून द्यावं, अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांकडून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं जात आहे.
Comments
Post a Comment