गवळी मोहल्ल्यात ड्रेनेज ओव्हरफ्लोचा त्रास; नागरिक संतप्त, महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
गवळी मोहल्ल्यात ड्रेनेज ओव्हरफ्लोचा त्रास; नागरिक संतप्त, महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मिलिंद काळे– महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर :
शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. “स्वच्छ महाबळेश्वर – सुंदर महाबळेश्वर” हा नारा केवळ मुख्य बाजारपेठेपुरता मर्यादित आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. गवळी मोहल्ल्यातील अस्लम बेपारी यांच्या घराशेजारील ड्रेनेज लाईन फुटल्याने घाणीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले असून, संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी या संदर्भात महाबळेश्वर नगरपालिका कार्यालयात जाऊन तोंडी तक्रार केली. तसेच वारंवार फोनद्वारे संपर्क साधून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून “आज करतो”, “उद्या करतो” अशा आश्वासनांपलीकडे काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार फोन येत असल्याने नगरपालिकेचे मुकादम मनोज चव्हाण यांनी आता फोन उचलणेच बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून, आता या प्रकरणाची तक्रार मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे करण्याची तयारी सुरू आहे.
ड्रेनेज ओव्हरफ्लो झालेल्या जागेजवळच नगरपालिका संचालित मुलांची शाळा क्रमांक १ आणि मुलींची शाळा क्रमांक २ आहेत. शेजारील वस्ती दाट असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचा श्वास घेणेदेखील कठीण झाले आहे. सतत साचलेले घाणीचे पाणी आणि वाहणारे ड्रेनेज यामुळे परिसरात माशा, डास यांचा त्रास वाढला असून, लहान मुले आजारी पडू लागली आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांचा संताप वाढला आहे.
या घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरात रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने तातडीने या ठिकाणी स्वच्छता करून ड्रेनेज दुरुस्त करावे, तसेच मुकादम मनोज चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीवर महाबळेश्वर नगरपालिकेने तत्काळ लक्ष देऊन प्रत्यक्ष कारवाई न केल्यास, येत्या काही दिवसांत नागरिक आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment