पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने "एकता दौड"चे भव्य आयोजन सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस व आजीवन विभागाचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने "एकता दौड"चे भव्य आयोजन
सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस व आजीवन विभागाचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
✍️प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी :
भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज पोलादपूर शहरात राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रायगड जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली व पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने “रन फॉर युनिटी” म्हणजेच एकता दौड चे आयोजन करण्यात आले.
या विशेष उपक्रमाचा उद्देश देशातील एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या एकता दौडला सकाळी प्रारंभ झाला. पोलादपूर शहरातील मुख्य बाजारपेठ, महाबळेश्वर रस्ता आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून दौडचे मार्गक्रमण झाले. विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय ध्वज आणि "एक भारत, श्रेष्ठ भारत" अशी घोषवाक्ये झळकत होती.
या एकता दौडमध्ये सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व आजीवन अध्ययन विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांसह पोलादपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
दौड संपल्यानंतर उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. “भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षा यासाठी आपण सदैव तत्पर राहू” अशी शपथ घेताना वातावरण देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पोलादपूरचे तहसीलदार श्री. कपिल घोरपडे तसेच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन यशस्वी व्हावे यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, श्री. मुंडे आणि सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. राम बरकुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे पोलादपूर शहरात ऐक्य, शिस्त आणि देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या झालेल्या या “एकता दौड” मुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागृत झाला असून, हा दिवस सर्व सहभागींसाठी प्रेरणादायी ठरला.
Comments
Post a Comment