Skip to main content

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा “साहित्य संगम सोहळा” उत्साहात पार – आगरी संस्कृतीच्या जतनाचा संकल्प दृढ

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा “साहित्य संगम सोहळा” उत्साहात पार – आगरी संस्कृतीच्या जतनाचा संकल्प दृढ


 मिलिंद खारपाटील,

मांडला  प्रतिनिधी :

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित “साहित्य संगम सोहळा” अलिबाग तालुक्यातील मांडला येथील ग्रीन किंग रिसॉर्ट येथे रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात व साहित्यिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील शेकडो आगरी साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अमृत पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ. मानसी म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश भोपी, साहित्यिक चंद्रकांत पाटील, ‘आवाज महामुंबईचा’ चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, ॲड. राकेश पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार धम्मशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वावे गावातील कलाकारांनी सादर केलेल्या गायन आणि भवर नृत्याने आगरी संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवले. त्यानंतर स्वागतपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी “आगरी भाषा लोप पावणार नाही, एक आगरी लाखांना भारी” असा दृढ विश्वास व्यक्त करत आगरी संस्कृती आणि भाषेच्या जतनासाठी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

आपल्या मनोगतात सौ. मानसी म्हात्रे म्हणाल्या, “आगरी भाषा जोमाने पुढे जात आहे. अनेक नवनवीन पुस्तके या भाषेत प्रकाशित होत आहेत. नवोदितांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. उच्च शिक्षण घेत साहित्य क्षेत्रात सक्रीय राहा, तुमच्या लेखणीतून आगरी समाजाचे वैभव जगासमोर यायला हवे.”

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुरेश भोपी, कृष्णा जोशी, मारुती बागडे, अरुण द. म्हात्रे, प्रा. संदेश पाटील, जयंत पाटील, विकास पाटील आणि चंद्रकांत कांडपिले या नामवंत व्यक्तींचा समावेश होता.

त्याचप्रमाणे समाजातील अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सौ. मानसी म्हात्रे यांना ‘सरखेल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

सोहळ्याचा आणखी एक विशेष क्षण म्हणजे नंदेश गावंड यांच्या “आगरास्त्र” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक आगरी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि ओळखीवर आधारित असून उपस्थितांनी या प्रकाशनाचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन तृप्ती गावंड यांनी ओघवत्या शैलीत केले, तर कार्यक्रमाची सांगता सुश्राव्य भजनाने करण्यात आली.

या साहित्य संगम सोहळ्याने आगरी साहित्यविश्वात नवा जोश निर्माण केला असून, आगरी भाषेच्या संवर्धनाचा आणि नव्या पिढीपर्यंत साहित्यप्रेम पोहोचवण्याचा संकल्प या वेळी सर्व उपस्थितांनी दृढ केला.



Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...