पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
पोलादपूर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या ४८ तासांत १६४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत पावसाने अक्षरशः अतिवृष्टीचे रौद्र रूप दाखवले. नदीपात्रे, पाणी साठे आणि धरणांमध्ये जलदगतीने पाणी साचल्याने नद्यांना नवसंजीवनी मिळाली.
मुसळधार सरींनी विस्कळीत जनजीवन
रविवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तास जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला, तर वाहतूकही मंदावली. सोमवारी सकाळी मात्र परिस्थिती पूर्वपदावर येऊन रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ दिसू लागली. सोमवारी दिवस-रात्र मिळून फक्त ७ मि.मी. पावसाची नोंद झाली.
दरडी व झाडे पडण्याच्या घटना
पावसामुळे डोंगरी भागांत दरडी व झाडे पडण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. कापडे खुर्दजवळ मातीचा ओसरा आला, तर कुडपण गावात विजेचा पोल कोसळून अडथळा निर्माण झाला. दरडींचे संकट आंबेनळी घाट, जुना कशेडी घाट, कशेडी बंगला मार्ग, कशेडी बोगदा व पलचिल मार्गावर कायम राहिले आहे. गतवर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने आंबेनळी घाट जवळपास एक महिना बंद ठेवावा लागला होता. यंदाही पावसाळ्यात लहानमोठी झाडे व दरडी पडण्याच्या घटना सुरू आहेत.
पावसाची आकडेवारी
तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर, कुडपण, दाभिळ, चिरेखिड, कीनेश्वर, तुर्भे, भोगाव, दिविल, देवळे, ढवळे आदी गावांत परतीच्या सरींमुळे दमछाक झाली. डोंगरी व घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त झाले आहे.
- २०२३ मध्ये तालुक्यात ४,१०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
- २०२४ मध्ये पावसाचे एकूण प्रमाण ४,३१९ मि.मी. पर्यंत पोहोचले.
- जून : ६१६ मि.मी.
- जुलै : २,१९१ मि.मी.
- ऑगस्ट : ९४२ मि.मी.
- सप्टेंबर (आजपर्यंत) : ५७० मि.मी.
- तर यावर्षी आतापर्यंत ४,०७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पुढील दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
पोलादपूर तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३,६८६ मि.मी. इतके आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हे प्रमाण सातत्याने वाढत असून, यंदाही सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आधीच झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हंगाम अखेरीस सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
आपत्तीचे सावट कायम
दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि वाहतूक विस्कळीत होणे या घटना या हंगामातही सुरूच आहेत. विशेषतः घाटमाथा व डोंगरी भागातील गावांमध्ये सततचा पाऊस व दरडीचे संकट पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनानेही आपत्कालीन पथकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment