काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टी-शर्टसचे वितरण
पोलादपूर, दि. १२ सप्टेंबर २०२५ :
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल येथील काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था ही नेहमीच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत आली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलादपूर येथे शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांना नुकतेच स्पोर्ट्स टी-शर्टसचे वितरण करण्यात आले.
पोलादपूरसारख्या दुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही संधी मिळावी, यासाठी काळकाई माता संस्थेने विशेष पुढाकार घेतला आहे. या वर्षीच्या शैक्षणिक उपक्रमात संस्थेतर्फे माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टी-शर्टस देण्यात येत आहेत. सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याच उपक्रमाअंतर्गत स्पोर्ट्स टी-शर्टसचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश सकपाळ, सल्लागार श्री. विजय दरेकर सर, श्री. गिरीधर दरेकर सर, उपसरपंच श्री. राजेश कदम, श्री. आशुतोष दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा संस्थात्मक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. नाथिराम राठोड यांनी केले होते. क्रीडा विभागाचे डॉ. पोपटराव भोसले, डॉ. सुधाकर जाधव तसेच कार्यालय अधीक्षक श्री. मुकुंद पंदेरकर यांनीही या कार्यक्रमात सक्रिय योगदान दिले.
काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेच्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम आणि शिस्तबद्धतेसोबतच प्रोत्साहनाची भावना वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment